Nov 26, 2017

तू नव्हतीस आई...


"अगं दाखव तरी ना किती लागलंय??" आई
"तुला काय करायचंय? इमर्जन्सी कॉल केला शाळेतून तेव्हा कुठे होतीस? का आली नाहीस लगेच?" मैत्रेयी
"हो अगं, अडचण आली होती, म्हणून तर मावशी ला फोन केला ना मी!तिला सांगितलं ना तुला शाळेतून घेऊन यायला!"
पुन्हा मैत्रयी चिडली," पण मला तू यायला हवं होतंस. सगळ्यांच्या आया येतात शाळेत काही झालं की, पण तुला कधी वेळ नसतो माझ्यासाठी."
असे अनेक प्रसंग यायचे जेव्हा आई तिच्याजवळ नसायची आणि ती आईला त्याबद्दल दोष देत राहायची..तिला सतत वाटायचं आपल्यापेक्षा आईला आपली नोकरी जास्त important आहे.
आईने किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, " पिलू मी का माझ्या मनाने तुला दूर करते, पण कधी कधी नाईलाज होतो, कधी ऑफिसमध्ये उशीर होतो, कधी ट्रॅफिक जाम मध्ये, तर कधी अजून कशामुळे,पण माझं मन, माझे डोळे सतत तुझ्याकडे लागलेले असतात. माझ्या बाळ आलं असेल शाळेतून, त्याने काही खाल्लं असेल का, माझी वाट पाहत असेल, एक ना अनेक फक्त तुझे विचार असतात."
पण..मैत्रयी ला मात्र पटलंच नाही..
हळू हळू तिची मनातली अढी वाढत गेली आणि तिने आईचं आपल्या जवळ असणं expect करणं सोडून दिलं...
आज कित्येक वर्षांनी तिला आईची मनापासून आठवण आली ..कारणही तसंच होत.
कारण तिची स्वतः ची मुलगी आज तिला समजावून सांगत होती, " आई , अगं तू जॉब का नाहीस करत??"
मैत्रयी, " अगं ,पण मग तुझ्याकडे कोण पाहणार? तुझी शाळा, तुझा अभ्यास, तुझा डबा.. कितीतरी गोष्टी आहेत."
" पण तू तुझ्यासाठी कर ना काहीतरी. माझ्या स्कूल मध्ये सगळ्यांच्या ममा जॉब करतात. कसल्या मस्त राहतात. टिपटॉप.
तू पण जॉब कर, मी माझं सगळं करून घेईन ग! इतकं काय मोठं त्यात?"
"पण तुझी काळजी.."
"म्हणजे तू जॉब ला गेल्यावर माझी काळजी करायचं सोडून देणारेस का? माझी काहीतरी व्यवस्था करशीलच ना. तूच असशील ना त्या काळजीमागे?
I know Mumma u love me. "
मैत्रयी विचार करू लागली, खरोखर आपण असा विचार का नाही केला कधी? सतत आईला दोष दिला, तिचं ही काळीज तुटत असेल मला सोडून जाताना. मनाची घालमेल होत असेल. नोकरी तिची गरज होती पण आपण कधी समजून घेतले नाही..सतत काम करण्यात, आपले अस्तित्व हरवून बसलेली आई तिला आठवली..म्हणूनच आज तिला आईची खूप आठवण येत होती. मनापासून...


© हर्षा स्वामी....