Oct 17, 2012

माहेरा





कशी माहेराची ओढ,
जाते काळजाला चीर.....
            आई माझ्या संगतीने
            एक रुप तु लाविले,
            रुप त्याचे गं फुलले,
            माझ्या सोबतीने...
आज एकटेच काय,
सांग करित असेल?
माझ्याविना सांग त्याला,
येतो का गं बहर??
            पाय़ी नाचती आंगणी,
            रुमझुमती पैजणी,
            पुन्हा पुन्हा आठव हे,
            सांग येती का गं कानी?
मला पाहताच बाबा,
म्हणॆ पोर ही अजाण,
ज्याच्या हाती जाशील तू,
तेथे सुवर्णाची खाण....
            सांग त्याचे हात का गं,
            आज झालेत का सुने?
            माझ्यावाचून का त्याला,
            फिके भासते चांदणॆ....
सांग ना गं आई.....
आठवण माझी तेथे,
येते कोणा कोणा....
माझ्या श्वासाचा गं भास...
तिथे होतो कोणा कोणा...

आभाळ





हे भरून आलेलं आभाळ
काही केल्या रितं होत नाही..
पुन्हा पुन्हा बरसून सुद्धा,
समाधान त्याचं होत नाही,
एक पाऊल पुढे टाकून,
त्यालाही मोकळ्या आभाळात मिसळायचय...
पण पूर्ण रितं झाल्याशिवाय,
त्याला पुढं जाता येत नाही...

ती

ती छोटीशी सात-आठ वर्षांची चिमुरडी, आपल्या आईचं बोलणं मन:पुर्वक ऐकत होती. तीच्या खांद्यावर हात ठेवून आई सांगत होती, "मधु, तु मोठी झालीस आणि तुला कुणी नाव विचारलं तर फक्त मधुगंधा सांगायचंस. ना आईचं नाव, ना बाबांचं नाव आणि ना आडनाव. तू ’तू’ आहेस. कुठल्या एका देशाची नाहीस, कुठल्या एका जातीची नाहीस आणि कुणाचाही तुझ्या आयुष्यावर हक्क नाही. तु जगणार आहेस, केवळ ’मधु’ म्हणून!"
    ती भान हरपून आपल्या आईकडे पहात होती. सतत अबोल असणारी, आपल्यावर माया करणारी आई, आज काही वेगळंच सांगते आहे. सगळंच तीला कळंत होतं असं नाही. पण एवढं मात्र कळत होतं की, ते चांगलं आहे. या जाणिवेने मग ती स्वत:शीच हसली, आणि तिच्या गुलाबी गालांवर अजुन मोहक छटा उमटली! ती आईला घट्ट बीलगली.
     पण आईला मात्र वाटत राहिलं, ’ आपल्याला हवं तसं आयुष्य कुठे जगता येतं? असं एखाद्या लहान मुलाच्या मनावर आत्तापासून कितीही ठसवलं तरी त्याचं मन कोणत्या गोष्टिकडे वळॆल हे सांगता येत नाही. ’ पण तरीसुद्धा ती प्रयत्न करणार होती, तीला फक्त ’माणुस’ बनवण्याचा!

Oct 10, 2012

जीवन

    जवळ असणा-या गोष्टी अचानक कधीतरी आपण दूर लोटतो, पण मग दूर गेल्यानंतर त्या आपल्याला पुन्हा हवयाहव्याशा वाटतात. मग पुन्हा आपण त्यांना आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. पण जेवढे त्याच्या पाठीमागे लागतो..तेवढ्याच त्या आणखी दूर जातात. मग शेवटी आपल्याला वाईट वाटतं. आपण थकतो, अन त्याचा नाद सोडून देतो. मग मात्र अचानक..अलगद..ती गोष्ट नकळत पुन्हा आपल्या जवळ येते. व. पुं च्या म्हणण्याप्रमाणॆ ’हवी ती गोष्ट हवी तेव्हा न मिळणं यालाच जीवन म्हणतात!’ हेच खरं! सगळं हवं ते मिळालं असतं तर आपण कशासाठी धडपडलो असतो, नाही का? कुणालातरी, काहीतरी हवं असतं, म्हणूनच माणसं जगतात. मग ते प्रेम असो, मैत्री असो किंवा पैसा. सगळं सेमच..निरपेक्ष जगणारी माणसं विरळाच. मग ते मिळवण्यासाठी आपण नाती जोडतो..कधी रक्ताची, तर कधी मनाने बांधलेली..एकमेकांच्या कोशात नकळत डोकवायला लागतो..सुखदु:खात आधार शोधायला लागतो..

पण सारं काही करून, मिळवून..समाधानापासून दूरच असतो..असे का?

एक शिक्षका- अ‍ॅन सिलीव्हन(Sullivan)

हेलन केलर हे जगाला परिचित असलेलं व्यक्तिमत्त्व. ती एक गोड मुलगी होती जीला लहान वयातच आपल्या मुलभुत दोन इंद्रियांना गमवावं लागलं; डोळे, कान अणि पर्यायाने ती मुकि बनली. पण तरीही ती एक लेखिका,एक अभिनेत्रि अणि एक समाज कार्यकर्ती म्हणून गाजली. वयाच्या पाचव्या वर्षी अ‍ॅन सिलीव्हनने तिच्या आयुष्यात एक शिक्षक म्हणून प्रवेश केला, आणि त्यानंतर तिने आपलं आयुष्य हेलनसाठी समर्पित केलं. "आंधळि" या अनुवदित पुस्तकात शांता शेळके यांनी हेलन केलर आणि अ‍ॅन या दोघींची  जिद्द, चिकाटी यांचं सुरेख वर्णन केलं आहे.  हेलन आपल्या अन्धत्वामुळे,चिडखोर आणि हट्टी मुलगी बनलि होती. परन्तु, अ‍ॅन सिलीव्हनने तिच्यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले.तिने हेलनला  शिक्षण द्यायला सुरुवात  केल्यानन्तर तिच्या समोर कितीतरि प्रश्न असतील. हेलनला द्रुष्टी नव्हती,ती बहिरि आणि मुकिहि होती. मग तिला या जगाची ओळख कशी करुन द्यायची?  अ‍ॅनने तिला स्पर्शाने नव्या जगात पाऊल टाकण्यास मदत केली.  बोटांच्या लिपिच्या सहयाने तिला निरनिराळ्या गोष्टि वाचून दाखवल्या..तिच्याबरोबर सतत राहणं, तिला अनेक ठिकाणि प्रवासाला नेणं, तिच्या प्रश्नांना उत्तरे देणं..या सगळ्याला अ‍ॅन कधिच थकली नाहि.  प्रवासाला गेल्यानंतरसुद्धा, अ‍ॅन हेलनला बाहेरच्या वातावरणाचे हुबेहुब वर्णन करुन सांगत असे. ऋतु, चंद्र,चांदणे,रंग, यांना तर ना स्पर्श ना गंध !  परन्तु, अ‍ॅन हेलनला आपल्या वर्णनातुन सतत सांगत असे.
                      अ‍ॅनला स्वत:ला निट दिसत नव्हते. तिला एक विशिष्ट प्रकारचा चष्मा लावावा लागे. हे अन्धत्व तिला लहानपणी गरिबी आणि कुपोषणामुळे आले होते. तरिदेखिल ति हेलनसाठी अविरत कष्ट घेत होती. तिला आजुबाजूच्या घटनांचा परिचय करुन देत होती.तिच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करत होती. तिच्यामध्ये उत्तम संस्कारचं बिज रोवत होती. अ‍ॅन हेलनसाठि केवळ एक शिक्षक नव्हती, ती हेलनची बहिण, मैत्रिण, अधार  सर्व काहि होती.
               ज्यावेळि हेलनने आपले आत्मचरित्र प्रकशित केले त्यवेळि अमेरिकेतिल एका प्रसिद्ध लेखकने हेलनला पत्रात म्हट्ले," तु आणि तुझ्या बाई,दोघीजणी केवळ अद्भुत आहात. हेलनसारख्या मुलीसोबत राहणे म्हणजे स्वतःच्या इच्छा,व्यक्तिमत्त्व,आवडीनिवडी पार पुसुन टाकण्यासारखेच होते..हेलनसाठी समर्पित केलेल्या आयुष्याखातर अ‍ॅन आपले वैवाहिक सुखदेखिल नकारयला तयार होती. जीवनाचे सगळे क्षण तिने हेलनला दिले. तेहि स्वखुशीने, स्वमर्जीने. खरंच हेलन तर अद्भुत होतीच पण त्याहून अद्भुत होती तिची शिक्षिका अ‍ॅन!